मित्राला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं पडलं महागात

वेबटीम : वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत घराबाहेर रात्री उशिरापर्यंत फिरणा-या मुलाला आणि त्याच्या मित्रांना एका पित्याने बांबूने मारहाण केली. ही धक्कादायक घटना  कॅम्प परिसरातील गीता सोसायटीत घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली असून आरोपी युसूफ मेमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी  अजून मोकाट आहे
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ताहा हुजेफा हुंडेकरी याच्या मित्राचा जन्मदिवस असल्याने तो त्याच्या मित्रासह शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12.00 वाजता गीता सोसायटीतील त्याच्या घरी गेले होते. दरम्यान शुभेच्छा दिल्यानंतर ते तिघे कल्याणीनगर आणि विमाननगर परिसरात फिरून रात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास गीता सोसायटीजवळ परत आले. त्यावेळी युसूफ मेमन हे सोसायटीच्या गेटच्या बाहेर लाकडी बांबू घेऊन उभे होते.फिर्यादी आणि त्याचे मित्र गाडीतून खाली उतरताच युसूफ मेमन यांनी तुम्ही इतक्या रात्री उशिरापर्यंत घराबाहेर का फिरता असे विचारत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत फिर्यादीच्या नाकावर लागल्याने त्याचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. मारहाणीनंतर फिर्यादीने घरी जाऊन वडिलांना हा प्रकार सांगितला आणि याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात युसूफ मेमन यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दिली.आमच्या मुलाला मारहाण केली याचा जाब विचारण्यासाठी कुटुंब मेमनच्या घरी गेलं मात्र ते घरी नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली त्यांनी त्यांच्या मुलाला ही मारहाण केली असल्याचे हुंडेकरी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे या सर्व प्रकारचा तपास पोलीस करत असून  पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारी वरून मोमीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती बंडगार्डन पोलीसानी दिली