भाजपचा कार्यक्रम उधळून लावणा-या सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

bjp-shivsena war

औरंगाबाद : भाजपच्या कार्यक्रमात गोंधळ करून कार्यक्रम उधळून लावणा-या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.नुकत्याच झालेल्या कामाचे श्रेय भाजपला मिळू नये म्हणून हा गोंधळ करण्यात आला. सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रातून आपली गावे वगळण्याची मागणी वाळूज परिसरातील गावक-यांची होती त्या प्रमाणे आठ गावे वगळण्यात आली म्हणून गावक-यांनी आनंद साजरा करण्यासाठी कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमास भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना बोलावण्यात आले होते.आमदार प्रशांत बंब व शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने पाठपुरावा केल्यामुळेच सदरील गावे अधिसूचित क्षेत्रातून वगळण्यात आल्याने त्यांच्या सत्काराची तयारी करण्यात आली होती.पत्रकारांनाही पाचारण करण्यात आले होते. आमदार बंब पत्रकारांना या बाबत सांगणार होते.याच कार्यक्रमात काल भिंत पडून ठार झालेल्या भावाबहिणीला श्रध्दांजली वाहण्यात येणार होती. कार्यक्रम सुरू होत असतानाच तेथे येवून शिवसेना पदाधिका-यांनी कार्यक्रमस्थळी असणा-या खुर्च्यांची तोडफोड केली आणि कार्यक्रम उधळून लावला. गावात आलेल्या आमदार बंब यांना शिवसेनेच्या घोळक्याने घेराव घातला.आमदार बंब यांनी सत्कार समारंभ रद्द करत असल्याचे जाहीर केले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी पाठपुरावा केल्यामुळेच सिडको प्रशासाने या गावांना वगळले आहे असे असताना भाजप श्रेय घेत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. तशाच प्रकारची चर्चाहि सोशल मिडीयावर चालु होती. तर सदर प्रकार लोकशाहिला घातक असल्याची टीका बंब यांनी केली आहे.