राज्यातील ८३ टक्के कुटुंबांकडे स्वच्छतागृहे…

सोलापूर : राज्यशासनाने राज्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात उद्दिष्ट ठेवून काम सुरू आहे. जिल्ह्यात मे ते ऑगस्ट या तीन महिन्यांत २०१ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून, ३७ हजार ८४० कुटुंबांनी स्वच्छतागृह बांधली आहेत. आज जिल्ह्यात ८३ टक्के कुटुंबांकडे स्वच्छतागृह असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. मागील तीन महिन्यांमध्ये पंढरपूरची आषाढी वारी काळात अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवले. यामध्ये ‘पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी’ हा उपक्रम राबवला. शिवाय महास्वच्छता अभियानात १२ हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत ५९ टन कचरा उचलला. स्वच्छतेचा प्रसार प्रचार करण्यासाठी ७८ ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल व्हॅनद्वारे माहिती देण्यात आली. या माहितीपटांचा ७२ हजार नागरिकांनी लाभ घेतला. बार्शी तालुक्यात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत १२ दिवसांमध्ये ३२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात आल्या. मंगळवेढा तालुक्यात हजार विद्यार्थ्यांना सामुदायिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कलापथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतीमध्ये पाणी स्वच्छतेबाबत जागृती केली. याबरोबरच पाणी गुणवत्तेसाठी १६ हजार ३०७ स्रोतांचे जीएसआय मॅपिंग करण्यात आल्याचे श्री. भारूड यांनी सांगितले.