घनकचरा व्यवस्थापनाच्या ८९ कोटी रुपयांच्या आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळणे बाकी

औरंगाबाद: गेल्या १६ फेब्रुवारीपासून कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या ८९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. आणि त्यानुसार मनपाला दहा कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला. परंतु या आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळालेली नसल्यामुळे मशीन खरेदीसाठी विलंब होण्याची शक्यता आहे.

शासनाने मंजूर केलेल्या या आराखड्यास महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता मिळत असते यासाठी महापालिकेने हा आराखडा सुधारणांसह जीवन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. परंतु अजूनही या आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे मशीन खरेदीसाठी विलंब होण्याची शक्यता आहे.

शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार पुढील वर्षात ३०० टन क्षमतेचा गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी व प्रत्येक प्रभागात प्रत्येकी एक बेलिंग, एक ग्रेडिंग आणि एक स्क्रीनिंग अशा २७ मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीन खरेदीच्या निविदाची कागदपत्रे महापालिकेतील अधिकारी तयार करीत आहेत. ती पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागणार असला तरी जोपर्यंत महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण कार्यालयाकडून आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळत नाही तोपर्यंत निविदा प्रसिद्ध करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.