गरिबांच्या खात्यात प्रति महिना ७५०० रू. थेट जमा करा – थोरात

balasaheb thorat and narendra modi

मुंबई -ज्या पद्धतीने भाजप नेत्यांकडून पंतप्रधानांच्या राष्ट्र संबोधनाचा उदो उदो करण्यात आला होता. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग व लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्यांसाठी भरीव मदत, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची घोषणा करतील व सीमेवर आगळीक करणा-या चीनला लाल डोळे दाखवतील अशी अपेक्षा होती मात्र पंतप्रधानाच्या संबोधनातून देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी घाणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गरीब वर्गाकरिता प्रति महिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्याची योजना लागू करण्यात आली होती. आपल्या देशातील शेतक-यांच्या मेहनतीने देशात प्रचंड मोठा अन्नधान्याचा साठा उपलब्ध असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सदर योजना सप्टेंबर पर्यंत वाढवावी अशी मागणी केली होती. अगोदरच्याच योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय हा प्रशासकीय असल्याने राष्ट्र संबोधनाची आवश्यकता नव्हती, पण कदाचित बिहारच्या निवडणुका पंतप्रधानांकरिता महत्वाच्या असाव्यात म्हणून त्यांनी स्वतः या योजनेला दिलेली मुदतवाढ जाहीर केली असावी.

गोरगरिबांना अन्नाव्यतिरिक्त इतरही गरजा असतात, त्यांचे काय? याबद्दल पंतप्रधानांनी अवाक्षरही काढले नाही. पाच किलो गहू किंवा तांदूळ व एक किलो चना ही मदत अत्यंत तुटपुंजी असून रोजगार गेलेल्या गरिबांचे कुटुंब महिनाभर यावर चालणार नाही. गरिबाचे घर चालवायचे असेल तर त्यांना रोख मदत देण्याची आवश्यकता आहे. राहुलजी गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात प्रति महिना ७५०० रू. एवढी मदत थेट द्यावी तरच त्यांचे घर सुरळित चालेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

नोव्हेंबर पर्यंत कोरोनाचे संकट राहणार आहे, अशी अप्रत्यक्षच कबुलीच पंतप्रधानांनी आज दिलेली आहे. त्यामुळे गरिबांसाहित मध्यमवर्ग, नोकरपेशा व बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. कोरोना संदर्भात देश समाधानकारक कामगिरी करत आहे. असे आश्चर्यकारक विधान पंतप्रधानांनी केले. कोरोनाच्या रूग्णसंख्येत जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या पंतप्रधानांकडे कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्याची कोणतीही ठोस उपाययोजना नाही हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे. चीनच्या संदर्भात पंतप्रधान ठोस भूमिका घेतील ही देशवासियांची अपेक्षा देखील फोल ठरली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कोकणासह राज्यातील आपद्ग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – उद्धव ठाकरे

आता रेशनच्या दुकानावर मिळू शकतात कांदे

‘रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा’