जागरण गोंधळ भोवला ; बीडमध्ये ७४ जणांना विषबाधा

बीड : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त केलेल्या मांसाहारी जेवणातून ७४ जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री बीडमध्ये घडली. सर्वांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.

बाबासाहेब गोकुळे यांच्या घरी मंगळवारी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हा प्रकार घडला आहे. लवकर स्वयंपाक करून रात्री उशिरा जेवण करण्यात आले. उकाड्यामुळे (उष्णता) अन्न खराब झाल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मांसाहारी जेवण केलेल्या सर्वच लोकांना काही वेळातच त्रास होऊ लागला. यानंतर तब्बल ७४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने विषबाधेचे रुग्ण आल्याने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनीही रात्री ११ वाजता रुग्णालयात धाव घेत पाहणी केली. अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही याची माहिती दिली. दरम्यान, अन्नाचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.







Loading…




Loading...