कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात असल्याप्रकरणी ७ संशयित नक्षली ताब्यात

बॅनर्स आणि भीमा कोरेगावसंबंधी मजकूर असलेली कागदपत्रे मिळाली आहेत

कल्याण : कोरेगाव भीमा हिंसाचारात सहभागी असल्याच्या संशयावरून शनिवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सात जणांना ताब्यात घेतले. या सर्वांचा सीपीआय (माओवादी) या संघटनेशी संबंध असल्याचे समजते. हे सर्वजण मुळचे आंध्रप्रदेशचे असून सध्या कल्याण, डोंबिवली आणि मुंब्रा परिसरात वास्तव्याला होते. एटीएसने या सर्वांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्याचे समजते.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा हिंसाचारात या सात जणांचा भीमा कोरेगाव हिंसाचार आणि महाराष्ट्र बंदच्यावेळी झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. हे सर्वजण आंध्र प्रदेशच्या नालगोंदा आणि करीनगर या भागात राहणारे आहेत. ते सीपीआय (माओ) या नक्षलवादी संघटनेच्या संपर्कात होते. हे लोक सध्या कल्याण परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. एटीएसने त्यांच्या घरावर छापे टाकले तेव्हा त्याठिकाणी काही बॅनर्स आणि भीमा कोरेगावसंबंधी मजकूर असलेली कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावला आहे. सध्या काळाचौकी परिसरात या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव, सणसवाडीतील हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. भीमा कोरेगाव येथे सोमवारी विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच दुपारी समाजकंटकांनी सणसवाडी, भीमा कोरेगाव येथे वाहनांवर दगडफेक केली होती. या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले असून मंगळवारी राज्यात मुंबईतील गोवंडी, मुलुंड, चेंबूर, तसेच पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या शहरांमध्ये हिंसाचाराविरोधात आंदोलन झाले होते.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...