fbpx

समाजकंटकांनी धरणाचे गेट तोडले,लाखो लिटर पाणी वाया गेले

नाशिक – अवघा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना कळवण तालुक्यातील धनोरी येथील धरणाचे गेट तोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दळवट येथील प्रमोद बयाजी पवार, सोनू बंडू गावित, शंकर केवजी चव्हाण, सुभाष शिवाजी पवार अशी आरोपींची नावे आहेत.त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री सात वाजेच्यादरम्यान धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडल्यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड लोट सुटला. ही बाब आदिवासी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गेटच्या बाजूने धावत जाऊन त्या चारही व्यक्तींना पकडले. त्यानंतर कळवणचे तहसीलदार बंडू कापसे, पोलीस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्यासहित पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत रौदळ हे घटनास्थळी दाखल झाले व सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर धरणाचे गेट तोडणाऱया दळवट येथील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाण्याचा मोठा लोट शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत धरणात १५ एमसीएफटी इतके पाणी होते. परंतु गेट तोडल्याने जवळपास सात ते आठ एमसीएफटी पाणी वाया गेले.