तब्बल 7 कोटी गणेशभक्तांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे ऑनलाईन दर्शन

dagdusheth 2017

पुणे-  केवळ भारतातच नव्हे जगभरात ख्याती पोहोचलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो नागरिक पुण्यामध्ये येतात. परंतु आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळ, फेसबुक, यू-ट्यूब, ऍपच्या माध्यमातून भारतासह अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, सिंगापूरसारख्या 40 हून अधिक देशांतील तब्बल 7 कोटी गणेशभक्तांनी यंदा ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे.

तर, शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम व आरती याकरीता या साईट्‌वर अपलोड केलेल्या व्हिडिओला 4 कोटीहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ट्रस्टचे सर्व कार्यक्रम पाहण्याकरीता 47 लाख लोकांनी पेजवर सातत्याने हजेरी लावली होती. फेसबुक पेजला आजपर्यंत 4 लाख 41 हजार फॉलोअर्स झाले आहेत.

तर, ऍपच्या माध्यमातून 28 हजारहून अधिक भाविक बाप्पाचे दर्शन घेत आहेत. ट्रस्टचे सर्व उपक्रम ऍपच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. अशोक गोडसे म्हणाले, शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त जगभरात जनजागृती व्हावी आणि गणेशोत्सवाचा मूळ उद्देश सर्वांपर्यंत पोहोचावा, याकरीता सोशल नेटवर्किंग साईट्‌च्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला.

ट्रस्टच्या संकेतस्थळासह फेसबुक पेज, ऍप यांसारख्या साधनांचाही उपयोग करण्यात आला. याकरीता ट्रस्टने नियुक्त केलेली टिम तब्बल पाच महिने कार्यरत होती. ज्या भाविकांना पुण्यात येणे शक्‍य नाही, अशांकरीता घरबसल्या संपूर्ण जगभरातून बाप्पांच्या दर्शनाची सोय या माध्यमातून करण्यात आली होती. तसेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे आयोजित सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांच्यामाध्यमातून पोहोचविण्यात आले.