आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी, ‘फिट इंडिया’ला प्रोत्साहन देणार – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

टीम महाराष्ट्र देशा : आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी, ‘फिट इंडिया’ला प्रोत्साहन देणार, ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार, 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं लक्ष्य असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

महिलांसाठी विशेष उपक्रमांना 28 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. तसेच शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. स्कील डेव्हलपमेंटवर 3 हजार कोटी खर्च करणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

याचप्रमाणे झारखंडमध्ये आदिवासी म्युझियम तयार करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. सांस्कृतिक खात्यासाठी 3150 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे असंही त्या म्हणाल्या. पर्यटन विकासासाठी 2 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, ग्रामीण भागात इंटरनेटचं जाळं पसवरणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेट पसरवलं जाणार. यासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच उडान योजने अंतर्गत नव्या 100 विमानतळांची निर्मिती केली जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.