कोरोनाच्या ६० हजार लसी औरंगाबादेत दाखल, चार जिल्ह्यांचा साठा उतरवला

corona vaccine

औरंगाबाद : मागील ९ महिन्यांपासून शहरवासीयांचा कोरोनाशी लढा सुरू आहे. लसीची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी कोरोनाच्या ६४ हजार लसी औरंगाबाद शहरात दाखल झाल्या. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारी लसीचे कंटेनर देशाच्या विविध भागांत रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी या विशेष वाहनाची पुजा करत लसीचे स्वागत केले.

कोणत्या बूथवर किती लसी?
पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी २६८ बूथ राहणार आहेत. मात्र हे सर्व बूथ टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा ११ बूथवर लसीकरणाला प्रारंभ होईल. तर शहरात मनपा हद्दीतील सात बूथवर लसीकरण होईल. पुण्याहून आधी या लसी रात्री पोहोचतील, अशी माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार लसीचा साठा ठेवण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते; परंतु त्यानंतर लस सकाळपर्यंत दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार या लसींचा साठा ठेवण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

ग्रामीण भागात याठिकाणी लसी दिली जाणार
जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी सिल्लोड, गंगापूर, वैजापूर उपजिल्हा रुग्णालय, कन्नड, पाचोड, खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात या दिवशी गणोरी, पालोद, दौलताबाद, मनुर, नीलजगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर म्हणजेच बूथ वर लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. शहरातील मनपा हद्दीत १८ बूथवर लसीकरण केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या