गुजरातमध्ये स्वाइन फ्लूमुळे गेल्या १५ दिवसांत ६० जणांचा मृत्यू

गांधीनगर : गुजरातमध्ये स्वाइन फ्लूच्या साथीने गंभीर रुप धारण केले आहे. गेल्या १५ दिवसांत स्वाइन फ्लूमुळे प्राण गमवलेल्यांची संख्या ६०वर पोहोचली आहे. तर, १ जानेवारीपासूनच्या आकडेवारी नुसार राज्यात आत्तापर्यंत २२० जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी अहवालानुसार स्वाइन फ्लूच्या २१०० रुग्ण आढळले आहेत. गुजरात सरकारने दिशानिर्देशही जारी केले आहेत. त्यात रुग्णालयांना व्हेंटीलेटर व टॅमी फ्लूच्या औषधांचा अतिरिक्त साठा जमा करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी गुजरातच्या चार मोठ्या रुग्णालयांना भेट दिली. त्यावेळी त्यांच्याबरोबर आरोग्य मंत्री शंकर चौधरीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी स्वाइन फ्लूच्या रुग्णांची, उपचाराबाबतची माहिती घेतली व डॉक्टरांच्या टीमसह बैठकही घेतली. त्वरित उपचार करता यावा यासाठी स्वाइन फ्लूच्या वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल लवकर देण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय १५ लाखांहून अधिक टॅमी फ्लू औषधे व ३ लाखांहून अधिक सीरप रुग्णालय व आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत.