बहुचर्चित सोनई हत्याकांडाप्रकरणी ६ संशयित दोषी

sonai hatyakand

नाशिक : नगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांड प्रकरणी ७ पैकी ६ संशयित आरोपींना न्यायालयाने आज दोषी ठरवले आहे. तर ७ वा संशयित फलके विरुद्ध पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली,अशी माहिती ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. दोषी आरोपींच्या शिक्षेवर गुरुवारी (१८ जानेवारी) नाशिक येथील न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे.

सोनई येथील तिहेरी हत्याकांड हा ऑनर किलिंगमुळेच झाल्याचे मत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सांगितले आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम बघितले. रघुनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण दरंदले (भाऊ), संदीप, त्यांचा नातेवाईक अशोक फलके व अशोक नवगिरे असे संशयित आरोपींची नावे आहेत. यापैकी अशोक फलकेला पुराव्याअभावी निर्दोष ठरविण्यात आले तर इतर सहा जणांना दोषी ठरविण्यात आले आहे.यातील सातवा संशयित अशोक रोहीदास फलके विरूध्द सादर पुरावे कुचकामी असल्याचा अशोकचे वकील राहूल कासलीवाल यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करत त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. इतर सहा जणांना या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले असून गुरुवारी (दि. १८) या प्रकरणी दोषींना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे १ जानेवारी २०१३ रोजी प्रेमप्रकरणातून तिहेरी हत्याकांड झाले होते. या प्रकरणाचा निकाल नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरु आहे. या घटनेत संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे अशी हत्या करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी सीमा ही नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी.एडचे शिक्षण घेत होती.संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणा-या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि सीमा यांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत दरंदले कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले.

सीमाचे वडील व गुन्ह्यातील संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण दरंदले (भाऊ), संदीप कु-हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक फलके व अशोक नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील शौचालयाच्या सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप थनवार, सचिन घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले होते.संशयितांनी अचानक हल्ला करत संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. पळून जाणा-या राहुल कंडारे याच्यावर कोयत्याने वार करून तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. घटनेतील सात संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकत्यार्चे मुद्दे, म्हणणे ग्राह्य धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.