पुण्यातील ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरु होणार; पालिका आयुक्तांनी दिली मंजुरी

school

पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता बघता पुणे शहरात थोड्या उशिराने शाळा सुरु करण्यात आल्या.

तर, मुंबईमध्ये अद्यापही शाळा सुरु झालेल्या नाहीत. तर, उर्वरीत राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु केल्यानंतर याच महिन्याअखेरीस पाचवी ते आठवीच्या शाळा देखील सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. राज्यातील कोरोनाचा धोका हा कमी झाला असून १६ जानेवारी पासून देशभरात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला देखील झाली आहे.

राज्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली होती. शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.

यामुळे राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता पालिकेनेही शहरातील शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून या शाळा सुरू होणार आहेत. याबाबतचा आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी सहमती आवश्यक असून ही सहमती शिक्षण पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभाग यांना सादर करावी लागणार आहे.

पुरेपूर सुरक्षेची काळजी घेणार !

शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करणे व स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर ) निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

वर्ग कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये भरवण्यात येऊ नये. हवा खेळती राहण्यासाठी वर्ग खोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या