कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू, राहुल गांधींचा दावा

rahul gandhi vs narendra modi

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनादरम्यान ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, असा दावा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,‘शेती-देशाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी प्राणार्पण केले आहे, पण आजही शेतकरी घाबरलेले नाहीत.’ पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘शेतकऱ्यांना भीक नको, न्याय हवा. तिन्ही कृषी कायदे मागे घेणे हाच एकमेव मार्ग आहे.’

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचे पाऊल उचलणे, हाच शेतकऱ्यांच्या आंदोलनावर एकमेव तोडगा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. केंद्र सरकारने अहंकार सोडून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क प्रदान करावा, अशी मागणीसुद्धा काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी ट्विटरवरून म्हणाले की, दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत ५०० जणांना प्राण गमवावा लागला आहे.

शेती आणि देशाचे संरक्षण करताना शेतकऱ्यांनी प्रसंगी प्राणाची आहूती दिली आहे; परंतु शेतकऱ्यांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने सत्याची कास धरलेली आहे, असे राहुल गांधींनी नमूद केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी ‘शेतकरी आंदोलनात ५०० जणांचा मृत्यू’ असे हॅशटॅग वापरले आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीसुद्धा केंद्र सरकारवर हल्ला चढविला आहे. ते म्हणतात की, शेतकऱ्यांना भीक नको आहे, तर त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. केंद्र सरकारने आता अहंकाराला दूर सारून राजहट्ट त्यागावा. यासोबतच तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत. हाच शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील एकमेव यशस्वी तोडगा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या