50 हजार शेतकऱ्यांना गाळाचा लाभ – आय. एस. चहल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या जनसहभागाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरात 1 हजार 963 धरणातील 1.4 कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून सुमारे 50 हजार शेतकऱ्यांच्या शेतात मोफत गाळाचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी दिली.

जनसहभागाने धरणातील गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशावरून मे 2017 मध्ये प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित एका बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

येत्या 31 मे पर्यंत सुमारे दोन हजार धरणांमधून गाळ काढला जाणार असल्याचे चहल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्यातील धरणांमधून गाळ काढून धरणांची पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि पर्यायाने त्या भागातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर हा धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतातील जमीन अधिक उपजाऊ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या कामाच्या यशस्वीतेत शेतकऱ्यांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सिंहाचा वाटा आहे.

या कामात आतापर्यंत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 89 लाख 2 हजार 336 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जनतेने स्वयंप्रेरणेने सहभागी होऊन यास लोकचळवळीचे रुप मिळावे यासाठी ठिकठिकाणी जनप्रबोधन, कार्यशाळा यांच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. बैठकीला जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, टाटा सन्सचे संचालक अमीत चंद्रा, केअरिंग फाउंडेशनचे निमेश शाह, अनुलोम या स्वयंसेवी संस्थेचे चंद्रशेखर वझे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment
Loading...