मामाच्या गावाला गेलेली ५ वर्षाची चिमुकली सापडली बिबट्याच्या तावडीत ; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू

पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील साकोरे गावामध्ये एका ५ वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रविवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली. श्रुतिका थिटे (वय ५, रा. जऊळके खुर्द, खेड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

श्रुतिका तिच्या आई सोबत साकोरे गावात आपल्या मामाकडे ५ दिवसांपूर्वी गेली होती. ती काल सायंकाळी ६ च्या सुमारास घराशेजारी असलेल्या मक्याच्या शेतात खेळत होती. तिची आई आणि आज्जी देखील तिथे काम करत होती.

दरम्यान, शेतामध्ये लपून बसलेल्या बिबट्यांने तिच्यावर जबरदस्त हल्ला केला. श्रुतीकाला तो ओढून नेण्याचा प्रयत्न करत होता. हे भयानक दृश्य पाहून शेतात काम करणाऱ्या श्रुतीकाच्या आई आणि आज्जीने आरडाओरडा केला. त्यामुळे आसपासचे लोक तिथे पळत आले. त्यामुळे बिबट्या श्रुतिकाला तिथेच टाकून पळून गेला. या ह्ल्य्यात मात्र ५ वर्षांची चिमुकली गंभीर जखम झाली, तिच्या गळ्याला बिबट्याने चावा घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. श्रुतीकाला तशाच अवस्थेत तिच्या नातेवाईकांनी मंचर येथील रुग्णालयात नेले. परंतु तिने प्राण सोडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आज बिबट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात आले असून  श्रुतीकाचे प्राण घेणारा नरभक्षक बिबट्या अजूनही ताब्यात आला नाही.