fbpx

राज्यात जोरदार पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल राज्यात हजेरी लावली. राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

या जोरदार पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. तर इतर दोन महिला आणि एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. तसेच जालन्यात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाला. तसेच हिंगोली जिल्ह्यातही वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात इतरही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले असले तरी बळीराजा आनंदी आहे.

दरम्यान, काल पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच पुढचे दोन दिवस असाच पाऊस पडेल असा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे.