सात सामने पाच कर्णधार

malinga

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील चौथा वनडे सामना आज येथे खेळवला जाणार आहे. खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि षटकांची गती योग्य न राखल्यामुळे प्रत्येक सामन्यात लंकेच्या संघात बदल झाला आहे.आता पर्यंत श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या आपल्या संघाने कसोटी आणि एकदिवसीय असे एकूण ७ सामने खेळले आहे मात्र या दरम्यान श्रीलंका संघाने तब्बल ५ कर्णधार बदलले आहेत .

भारतीय संघाचा हा दौरा खऱ्या अर्थाने २६ जुलै रोजी पहिल्या कसोटीने सुरु झाला.पहिल्या कसोटीमध्ये कर्णधार म्हणून रंगाना हेराथने जबाबदारी सांभाळली. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात दिनेश चंडिमल या पूर्णवेळ कसोटी कर्णधाराने जबाबदारी सांभाळली.

त्यानंतर २० ऑगस्ट रोजी वनडे मालिकेला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यात उपल थरंगा कर्णधार होता. तो लंकेचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील पूर्णवेळ कर्णधार आहे, परंतु षटकांची गती न राखल्यामुळे त्यावर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात बंदी घालण्यात आली. त्यामुळे वनडेमध्ये २१ची सरासरी असणारा चमारा कपुगेदरा संघाचा कर्णधार झाला. परंतु तोही तिसऱ्या सामन्यात दुखापग्रस्त झाल्यामुळे अनुभवी लसिथ मलिंगा संघाचा कर्णधार असेल.

लसिथ मलिंगाने यापूर्वी ६ सामन्यात लंकेचे टी२० मध्ये नेतृत्व केले असून ४ सामने जिंकले आहे. वनडे कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना आहे.अशा प्रकारे ७ सामन्यात ५ वेगवेगळे कर्णधार श्रीलंका संघाने पाहिले आहे.