कारमधुन गांजाची वाहतूक करणारे चौघे गुन्हेशाखेच्या जाळ्यात, ५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

औरंंगाबाद : कारमधुन अवैधरित्या गांजाची (कॅनबिस वनस्पती) वाहतूक करणा-या चौघांना गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गुरूवारी (दि.९) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास गजाआड केले. ही कारवाई गजानन महाराज मंदिर रोड ते पुंडलिकनगर रोडवर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ८० हजार रूपये किंमतीचा ४ किलो गांजा, ४ मोबाईल, एक कार असा एकूण ५ लाख ९५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली.

कारमधुन चार जण अवैधरित्या गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रावसाहेब जौंधळे, पोलिस अंमलदार नजीरखाँ पठाण, योगेश नवसारे, विरेश बने, पंढरीनाथ जायभाये, अश्वलिंग होनराव, रमेश गायकवाड आदींच्या पथकाने गजानन महाराज मंदिर रोड ते पुंडलिकनगर रोडवरील पारस एजन्सी समोर सापळा रचून कार क्रमांक (एमएच-२०-ईई-७३४१) अडवली.

पोलिसांनी कारमधील आनंद गौतम वाकळे (वय २१, रा.साई कॉलनी, हर्सूल), प्रविण रामचंद्र पाटील (वय १९,रा.लक्ष्मी नारायण नगर, लाडगांव, ता.वैजापूर), सुरज साबळे, कृष्णा गाडेकर या चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता एका पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये ८० हजार रूपये किंमतीचा ४ किलो गांजा (कॅनबिस वनस्पती) मिळून आली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गांजाची वाहतूक करणा-याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या