बीडमध्ये ४४ हजार ५०० लस उपलब्ध; गुरुवार पासून दुसरा डोस

बीड: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी ४४ हजार ५०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. गुरुवार पासून दुसरा डोस देण्यात येणार आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. या व्यक्तींनी ऑनलाइन नोंदणी करून जवळच्या केंद्रांमध्ये ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन लस घ्यावी, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

जिल्ह्यात ७ मेपासून माजलगाव, पाटोदा, धारूर ग्रामीण रुग्णालय, वडवणी व शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी पहिल्यांदा ऑनलाइन नोंदणी करून जवळच्या केंद्रांमध्ये ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन लस घ्यावी. तसेच गेवराई, बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी व केज याठिकाणी कोविशील्ड लस १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सर्व ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे. मंगळवारी जिल्ह्यात ४४ हजार ५०० लस उपलब्ध झाली. जिल्हा आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ६०० लस उपलब्ध करून दिली.

गुरुवार पासून जिल्ह्यातील सर्व संस्थांमध्ये पुन्हा कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. लसीच्या उपलब्ध साठयानुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना ज्येष्ठतेनुसार फोनद्वारे संपर्क करून लसीकरणासाठी बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत फोन केला त्यांनीच लसीकरण केंद्रावर यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

महत्वाच्या बातम्या