औरंगाबादेत गणेश विसर्जनावर होणार  ४२ लाखांचा खर्च!

ganesh visarjan

औरंगाबाद : महापालिकेने यंदा गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच शहरातील विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ९ परंपरागत विहिरींतील गाळ काढणे व दोन कृतित्र तलाव तयार करणे अशा एकूण अकरा विहिरींच्या कामावर एकूण ४२ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. जालाननगर येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामे अंतिम टप्प्यात आहे. विहिरींच्या ठिकाणी रंग देण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पालिकेकडून दरवर्षी गणेशोत्सवावेळी शहराच्या विविध भागात गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाते. गतवर्षी शहरात दहा विहिरींमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच दोन ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करुन तेही गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करुन दिले होते. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी या विहिरींमधील गाळ काढून त्यांची स्वच्छता केली जाते.

मात्र मागील काही वर्षांपासून या विहिरींमधील गाळ काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो आहे. नवीन विहिरी खोदण्यासाठी सरासरी तीन ते चार लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र पालिकेकडून एकेका विहिरीतील गाळ काढण्यासाठी त्याहीपेक्षा अधिक खर्च केला जात असल्याचे चित्र आहे. यंदाही पालिकेकडून विसर्जन विहिरींची कंत्राटदारांकरवी स्वच्छता करून घेतली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या