ग्रामपंचायतींमार्फत ४०० ऑनलाईन सेवा दिल्या जाणार

online game

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्था अधिकाधिक सक्षम करण्यासाठी तसेच सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असून ग्रामस्तरावरील प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात अधिकार बहाल करण्यात आले आहेत. यापुढे ग्रामपंचायतींमार्फत चारशे ऑनलाईन सेवा दिल्या जाणार आहेत. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

शासनाने ग्रामीण भागातही डिजिटल सेवा देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार हे केंद्र सुरू केले आहे. या माध्यमातून ग्रामविकास, महसूल व अन्य विभागांच्या सेवा देण्यावर भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी 1 नोव्हेंबरपासून हे काम सुरू झाले आहे. ज्या भागात इंटरनेट सुविधा, संगणक सुविधांचा तसेच अन्य तांत्रिक बाबींची कमतरता आहे, त्याची तरतूद करून या सेवा दिल्या जाणार आहेत.

याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच अन्य लाभार्थ्यांना होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची व वेळेची बचत होणार आहे.यामुळे विविध प्रकारचे दाखले, उतारे, कागदपत्रे त्वरित मिळण्यास मदत होणार आहे.शासनाने 2013 साली संग्राम केंद्र सुरू केले. त्या माध्यमातून संगणक परिचालकांना मानधनावर नेमले.

मात्र, तुटपुंज्या मानधनावर काम करून केंद्र शासनाचा ई पंचायत हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्यांनी मिळवून दिला. सध्या जरी आपले सरकार हे सेवा केंद्र जरी ग्रामीण भागात सुरू केले असले तरी त्याठिकाणी कायमस्वरूपी शासनमान्य संगणक परिचालकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे तरच ग्रामीण भागातील जनतेची कामे या माध्यमातून होऊ शकतील. यामुळेे ग्रामीण भागही आता काही वर्षात डिजिटल होईल असेच संकेत मिळत असून याकामी प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.