महाराष्ट्रात नद्यांवर बंधारे नसल्यामुळे तब्बल ४० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेलं

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या जून महिन्यात कृष्णा आणि वारणा नदीतून तब्बल ४० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेल्यानं अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. १२५ टीएमसी क्षमता असलेल्या अलमट्टी धरणात सध्या १०६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं पाणी अडवण्यासाठी नद्यांवर बंधारे नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ इथं पावसाचं पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे. मात्र तशी व्यवस्था राज्य सरकारनं अद्याप केलेली नाही. वरील तीनही ठिकाणी सिंचन योजनेद्वारे पाणी उचलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र या योजनांचे पंप पुरेशा क्षमतेने चालत नसल्यामुळं कृष्णा आणि वारणा नद्यातील पाणी दरवर्षी पावसाळ्यात थेट कर्नाटक मध्ये वाहून जातं. सदरचे पाणी अडवून कायम दुष्काळी तालुक्यातील गावांना द्यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.