3700 कोटी रुपयांच्या फसवणूक

पुणे  : सोशल मीडिया ट्रेडच्या नावाखाली व्यवसायाच्या आमिषाने नागरिकांची 3700 कोटी रुपयांची फसवणूक करणा-या आयुषी मित्तलला पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केली. आरोपी महिला मागील काही दिवसांपासून फरार होती. नोएडा एसटीएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अनुभव मित्तल याने ऑगस्ट 2016 मध्ये सोशल मीडिया ट्रेडच्या नावाखाली व्यवसायाला सुरुवात केली होती. कंपनीच्या सदस्य होण्यासाठी पैसे आकारून ब्लेज इन्फो सोल्युशन नावाच्या संकेतस्थळावरील लिंक लाईक करण्यास भाग पाडले जात होते. ही लिंक लाईक करणा-यांना कमिशन दिले जात होते. पैसे मिळण्याच्या आमिषाने फक्त सात महिन्यात साडेसहा लाख लोक या कंपनीचे सदस्य झाले होते. सदस्यांकडून घेतलेल्या 3700 कोटी रुपयांचा अपहार त्यांनी केला होता.

यातील मुख्य आरोपी अनुभव मित्तल याला उत्तर प्रदेश पोलिसांनी या पूर्वीच अटक केली आहे. मित्तलसह एकूण सहा लोकांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पुण्यातून अटक केलेली आयुषी मित्तल ही कंपनीची डायरेक्टर होती. घोटाळा उघडकीस आल्यापासून ती फरार होती. पोलीस तिच्या मागावर होते.