३७ वी राज्य मल्लखांब स्पर्धा चिपळूणमध्ये सुरू

malakhamb

टीम महाराष्ट्र देशा-  मल्लखांबासारख्या देशी खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम चिपळूण पालिकेले केले आहे. चिपळूणसाठी ही गौरवशाली बाब आहे. ही स्पर्धा चिपळूण शहरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहील, असे उद्गार आमदार भास्कर जाधव यांनी काढले. चिपळूणमधील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात ३७व्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक मल्लखांब स्पर्धेला आजपासून सुरवात झाली.

आमदार जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले, इंग्रज भारत सोडून गेले परंतु क्रिकेटचा प्रभाव भारतात वाढत गेला आहे. त्यामुळे भारतातील देशी खेळ लोप पावत असताना चिपळूणने मल्लखांबसारख्या खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यामध्ये पाग व्यायामशाळेची भूमिका महत्त्वाची आहे. ३५ वर्षांपूर्वी भागवत गुरुजींनी हा खेळ चिपळुणात सुरू केला. यापूर्वी दोनवेळा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा चिपळुणात झाली. स्पर्धेसाठी नंदुरबारपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागातील खेळाडू चिपळूणला आले आहेत. मी क्रीडा राज्यमंत्री असताना भारतातील देशी खेळांना चालना देण्याचा प्रयत्न केला होता.

इतकेच नव्हे तर बक्षिसाची रक्कम महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी समान असावी, यासाठीही मी प्रयत्न केले होते. नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्या कामात शहर विकासाची तळमळ दिसते. शहरातील मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेत सुरू असलेली अनेक वर्षांची चुकीची परंपरा मोडीत काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.