fbpx

३६ गर्भपात करणारे डॉ. तेजस गांधी आणि प्रियंका गांधी अटकेत

abortion

सोलापूर : अकलूजच्या डॉ. तेजस प्रदीप गांधी आणि डॉ. प्रिया तेजस गांधी या दांपत्याला अटक करण्यात आली असून दीड वर्षात या दोघांनी तब्बल ३६ स्त्रियांचा गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्हा प्रशासनाला या बद्दल काहीच माहिती नव्हती.

सातारा जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भुई यांनी २४ ऑगस्टच्या रात्री फोन करुन सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक मल्लिकार्जुन पट्टणशेट्टीनां माहिती दिली त्यावरुन गांधी यांच्या हॉस्पिटलवर छापा टाकण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांना अकलूजमध्ये गर्भलिंग निदान करुन गर्भपात होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सदरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक पट्टणशेट्टी, ॲड. रामेश्वरी माने यांच्या पथकाने २४ ऑगस्टच्या रात्री गांधी यांच्या सिया मॅटर्निटी ॲड नर्गीस होमवर छापा टाकला. यामध्ये डॉ. तेजस गांधी हे बेकायदेशीररित्या मॅटर्निटी होम चालवत असल्याचे निर्दशनास आले. तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ चे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

डॉ. तेजस आणि प्रिया गांधी यांनी १३ मे २०१६ ते २४ ऑगस्ट २०१७ या काळात ५ स्त्रियांचे गर्भलिंग निदान केले तर तब्बल ३६ स्त्रियांचे गर्भपात करुन त्या गर्भांची विल्हेवाट लावली आहे. अकलूजमध्ये उघडपणे स्त्री गर्भाला उमलण्याच्या आधीच मातीत गाढले जात होते याची साधी कल्पना कोणालाच कशी नव्हती हा प्रश्न आता पुढे येत आहे. ३६ गर्भपात करुन त्या गर्भांची कुठे आणि कशी विल्हेवाट लावली याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. सातारा जिल्हा शल्यचिकित्सकाना माहिती मिळते ? तर सोलापूरचे शल्यचिकित्सक झोपा काढत होते काय ? असा सवाल आता सामाजिक संघटना विचारत आहेत.

या प्रकाराने सोलापूर जिल्हा हादरून गेला असून जिल्ह्यातील सर्वच मॅटर्निटी होम्सची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. डॉ. तेजस आणि प्रिया गांधी यांनी अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास अकलूजचे पोलिस निरिक्षक अरुण सावंत हे करीत आहेत.