प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी ३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित – हेमंत टकले

विशेष उल्लेखाद्वारे धक्कादायक माहिती सभागृहासमोर आणली...

मुंबई – राज्यातील सुमारे ९ लाख अल्पवयीन मुली या बालकामगार असून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी जवळपास ३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाहीत असे एका संस्थेच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. अशी धक्कादायक माहिती आमदार हेमंत टकले यांनी विशेष उल्लेखाच्या सूचनेत विधानपरिषदेमध्ये मांडली.

ही पाहणी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये करण्यात आली. त्यानुसार १५ ते १९ या वयोगटातील ४९ लाख मुली आहेत. त्यापैकी १८.४ टक्के म्हणजे साधारण ९ लाख मुली या वेगवेगळया स्वरुपात बालकामगार म्हणून काम करतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण अधिक आहे.

नंदुरबार, गडचिरोली, जालना, हिंगोली या जिल्हयात ३१ ते ३९ टक्के मुली कामगार आहेत. तर ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगावमध्ये ३० टक्के मुली कामगार आहेत. या सर्व मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. अनियंत्रित क्षेत्रांमध्ये कामगार मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे माध्यमिकस्तरावर मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र आहे. या मुलींना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दयावी. माध्यमिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दयावी. त्यांना सायकली दयाव्यात या सूचनांचा शासनाने गांर्भियाने विचार करुन अंमलबजावणी करावी अशी मागणी विशेष उल्लेखाद्वारे आमदार हेमंत टकले यांनी केली.

You might also like
Comments
Loading...