मनपा स्वतःचा एक रुपयाही न गुंतवता उभे करणारे ३२ कोटींचे व्यापारी संकुल

औरंगाबाद : जुना बाजार भागातील नेहरू भवनची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे यासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांची निविदा अंतिम करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिका स्वतःचा पैसा न गुंतवता हे व्यापारी संकुल उभे करणार आहे. व्यापारी संकुलाचे दुकाने खरेदी करणाऱ्या व्यवसायिकांकडूनच हा निधी उभा केला जाणार आहे.

महापालिकेने टीव्ही सेंटर भागात भव्य व्यापारी संकुल उभारले आहे. येथे बांधकाम होण्यापूर्वीच गाळ्यांचा लिलाव करण्यात आला होता. त्यातून उभ्या राहिलेल्या पैशातून बांधकाम करण्यात आले. या धर्तीवर जुना बाजार भागातील वापराविना पडून असलेली नेहरू भवनाची इमारत पाडून भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या जागेवर ४८०० चौरस मीटर क्षेत्रावर ७९१४ चौरस मीटरचे बांधकाम केले जाणार आहे. त्यात तळमजला २२८३ चौरस मीटरचा असून त्यात २० दुकाने एक आणि एक प्रदर्शन हॉल असणार आहे.

पहिल्या मजल्याचे एकूण बांधीव क्षेत्र २०६३ चौरस मीटर असेल. त्यात पाचशे आसन क्षमतेचे प्रेक्षागृह एक स्टोअर रूम, २० दुकाने, एक अँकर शॉप, आणि एक प्रदर्शनी गॅलरी असणार आहे. ५२ कार्यालय आणि एक खुली गच्ची याच मजल्यावर तयार केले जाणार आहे. भुमजल्यात ९० चार चाकी वाहने उभ्या करता येतील एवढे वाहन तळ केले जाणार आहे. या सर्व कामाचे अंदाजपत्रक ३२ कोटी एक लाख ९३ हजार एवढी आहे.

एवढ्या मोठ्या रकमेचे बांधकाम महापालिका स्वतःचा पैसा न टाकता करणार आहे हे विशेष. महापालिका मुख्यालय पासून जवळ असलेले नेहरु भवन इमारत महापालिकेने सुरुवातीच्या काळात बांधली होती. या ठिकाणी औरंगाबाद शहराच्या सांस्कृतिक साहित्यिक उपक्रमांचे केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली होती. दोन दशकांपासून ही वास्तू अडगळीत पडली आहे. साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रम बंद झाल्यानंतर या वास्तूचा उपयोग शादी खाना म्हणून केला जात होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP