३१ फुटांचा इको-फ्रेंडली ग्रीन गणेश वेधून घेतोय औरंगाबादकरांचे लक्ष!

ganesh

औरंगाबाद : कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने यंदा औरंगाबादेतील सर्वात मोठ्या ३१ फुटांच्या इको-फ्रेंडली ग्रीन गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिडको एन-६ भागात बसवण्यात आलेला हा गणपती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाय पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे. त्यामुळे कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा हा गणपती गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. शहरातील विविध भागातून नागरिक या ठिकाणी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहेत.

गेल्या १० वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने विविध अनोखे उपक्रम राबवण्यात येतात. यापूर्वी तरंगता गणेश, चांद्रयान गणेश, दोन एकर शेतातील महागणेश, खेळाडू गणेश, सप्तधान्य पेरून इको-फ्रेंडली गणेशाचे देखावे तयार करण्यात आले होते. यावर्षी नारळाच्या पानापासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्यात आला आहे. या गणपतीसाठी २० लाकडी प्लायवूड, लाकडी पट्ट्या, बल्ली वापरण्यात आली. सजावटीसाठी नारळाच्या पानांची सुबक चटई बनवली.

६०० कागदी प्लेट-वाट्यांचा वापर केला. मुकुटाला कागदी सोनेरी वाट्या, रंगीत दगड, झाडांचे तुरे लावले. कागदी ग्लास वापरून गणेशाचे दात तयार केले. २०० स्टील व फायबर वाट्या वापरून रांगोळी व डिझाइन केली आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी गणेशाचे वाहन असलेल्या उंदरास मास्क लावून कोरोनापासून बचावाचा संदेश दिला आहे. याठिकाणी शहरातील ऐतिहासिक स्थळांची चित्रेदेखील लावण्यात आली आहे. या उपक्रमासाठी विलास कोरडे, अलका कोरडे, अच्युत कुलकर्णी, चंद्रमुनी जायभाये, अनिल गावंडे आदींनी परिश्रम घेतले.

महत्त्वाच्या बातम्या