आ. रवि राणा यांनी 3 दिवसांची पोलिस कोठडी

अमरावती-  शेतकरी आंदोलनादरम्यान शासकीय संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी बडनेरा येथील अपक्ष आमदार रवि राणा यांना आज, मंगळवारी 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. राणा यांच्यासह एकूण 27 कार्याकर्त्यांची रवनागी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी आज, न्यायदंडाधिकारी व्ही.एन. दीडवलकर यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीत आ. रवी राणा यांच्यासह 34 जणांना प्रत्येकी 500 रुपये दंड भरण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु, दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत भरण्याऐवजी मृत शेतक-यांच्या कुटुंबियांना देऊ अशी भूमिका आ. राणा यांनी घेतली. याप्रकरणी न्यायालयाने राणा यांच्यासह एकूण 27 जणांना 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान 34 पैकी 7 जणांनी दंड भरल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली. प्रकरणाचा तपशील शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी 2012 साली आ. रवि राणा यांनी तिवसा येथील अमरावती-नागपूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी एसटी बसची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी आ. राणा यांच्यासह एकूण 39 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणात 38 जणांनी जामीन मिळवला होता. तर आ. राणा यांनी जामीन नाकारल्यामुळे त्यांना 9 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती.

You might also like
Comments
Loading...