#पक्षांतर : कॉंग्रेस – राष्ट्रवादीला मिळणार अजून एक धक्का, ‘हे’ तीन आमदार भाजपच्या वाटेवर : सूत्र

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची गळती अजून सुरूच आहे. कारण आता तब्बल तीन आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार राजीनामा देणार असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच सांगितल जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंढरपूर – मंगळवेढ्याचे काँग्रेस आमदार भारत भालके, अक्कलकोटचे काँगेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. गेले काही दिवस भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे हे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. तर हे दोन्ही नेते भाजपात जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती.

दरम्यान गेले काही दिवस भारत भालके हे भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. अनेक भाजप नेते देखील त्यांच्याशी चांगलीच जवळीकता साधत आहेत. आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरच्या महापुजेला आले असता. त्यांनी भारत भालकेंच्या घरी पाहुणचार घेतला होता. त्यामुळे भारत भालके हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र याबाबत भालके यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.