मुंबापुरी मध्ये धडकणार आज ३ मोठे मोर्चे ; पोलिसांपुढे परिस्थिती हाताळण्याचे मोठे आव्हान

मुंबई : मुंबई मध्ये आज ‘मनसे’कडून संताप मोर्चा काढण्यात येतोय पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्च्याचे नेतृत्व राज ठाकरे करणार आहेत. त्यामुळे या मोर्च्याची तीव्रता अजून वाढली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारली असली तरी मनसे या मोर्च्यावर ठाम आहे. त्यामुळे हा मोर्चा आकळण्यात पोलिसांचे मोठे कसब पणाला लागणार आहे.

मनसे च्या या संताप मोर्चाबरोबर मुंबईत अजून २ मोर्चे निघणार आहेत त्यात गेल्या ४ आठवड्यापासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा मोर्चा असणार आहे. या अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला शिवसेनेने पाठींबा दिला असल्याने हा मोर्चा सुधा मोठ्या तीव्रतेने निघणार आहे.

त्याचबरोबर मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या तब्बल ४० मान्यताप्राप्त संघटनांनी एकत्र येत मुंबई मनपा आयुक्त अजय मेहता यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सर्व संघटनांच्या मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने आयुक्तांविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चाचे आवाहन केले आहे.

एरवी सामान्य परिस्थितीत मोर्चे हाताळणे पोलिसांना फारसे अवघड नव्हते. मात्र मनसे अध्यक्ष स्वतः मोर्चा मध्ये सहभागी असल्याने आणि एकूण ३ मोठे मोर्चे मुंबापुरी मध्ये धडकणार असल्याने पोलीस यंत्रणेसमोर ही परिस्थिती हाताळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.