दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ हजार ९०० कोटींचा निधी वितरित- चंद्रकांत पाटील

मुंबई: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या निधीतून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आज २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्तस्तरावर वितरित करण्यात आला आहे. लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडे सुमारे ७ हजार ९०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो ही निधी उपलब्ध होईल. असेही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या आजच्या बैठकीत विविध उपायांवर चर्चा झाली. यावेळी चारा छावण्या सुरू करण्यासाठीच्या नियमावलींवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव आल्यानंतर मंडळस्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात येणार आहेत. एका छावणीमध्ये साधारणपणे ३०० ते ५०० जनावरांचा समावेश असणार आहे. जनावरांच्या संख्येसंदर्भात तसेच आवश्यकता भासल्यास एकाच मंडळात दुसरी छावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार आहे. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.