देशातील विविध बँकांमध्ये २३ हजार कोटींचे घोटाळे

नागपूर : गव्हर्नर रघुराम राजन यांची गच्छती आणि नोटबंदी यामुळे गाजलेल्या २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशातील विविध बँकांमध्ये २३ हजार कोटींहून अधिकचे घोटाळे उघडकीस आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात अधीकृत आकडेवारी दिली आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘आरबीआय’कडे विचारणा केली होती की, २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले, याअंतर्गत किती कर्मचा-यांवर कारवाई झाली, नोटाबंदीनंतर बँकांमध्ये ५०० व १००० च्या किती नोटा जमा झाल्या इत्यादीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ‘आरबीआय’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत देशातील बँकांमध्ये १ लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे ५ हजार ७७ घोटाळे उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकामध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक यांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये २३ हजार ९३३ कोटी ९१ लाख रुपयांच्या रकमेचा समावेश होता. घोटाळे व फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये विविध बँकांनी आतापर्यंत ४८० कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांकडील आकडेवारी आजतागायत ‘आरबीआय’कडे आलेली नाही. दरम्यान, नोटाबंदीपासून देशातील विविध बँकांमध्ये नेमकी किती रक्कम जमा झाली याची माहितीच ‘आरबीआय’कडे उपलब्ध नाही हेदेखील माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. नोटाबंदी लागू झाल्यापासून बँकांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या नेमक्या किती नोटा जमा झाल्या, यातील किती नोटा बनावट होत्या, हे सांगणे शक्य नाही. सद्यस्थितीत मोजणीचे काम सुरू असल्याचे उत्तर रिझर्व्ह बँकेने दिली आहे.