परभणीत आढळले २१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा मृत्यू

परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ होत चालली आहे. रविवारी २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर २० जणांना उपचारानंत डिस्चार्ज देण्यात आला. सध्या परभणी जिल्ह्यात १७८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची आतापर्यंत ८ हजार २६८ एवढी झाली आहे. यातील ७ हजार ७६९ रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळं ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

५१५ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस
जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांसह महसूल व अन्य खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. २० फेब्रुवारीपर्यंत ७ हजार २०३ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. आता २८ दिवस पूर्ण झालेल्या ५१५ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ३ हजार ४१२ पुरुषांना लसीचा पहिला डोस, तर १४९ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर ३ हजार ७९१ महिलांना लसीचा पहिला डोस, तर ३६६ महिलांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.