fbpx

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणीअबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जण दोषी

1993 mumbai blast
मुंबई: मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने आज तब्बल २५ वर्षांनंतर गँगस्टर अबु सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जणांना दोषी ठरवलं आहे. बॉम्बस्फोटांसाठी गुजरातला आलेला शस्त्रसाठा अबु सालेमनं मुंबईत पाठवला होता, तर डोसानं स्फोटांसाठी लागणारं आरडीएक्स आणलं होतं.
दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि कटाच्या गुन्ह्यात अबु सालेम दोषी ठरला आहे, तर डोसावर हत्या आणि कटाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. फिरोज खान, ताहिर मर्चंट, करीमुल्लाह शेख आणि रियाज सिद्दीकी यांनाही कोर्टानं दोषी ठरवलं असलं तरी अब्दुल कयूमची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आता सोमवारपासून त्यांच्या शिक्षेबद्दलचा युक्तिवाद सुरू होणार आहे.त्यावर अवघ्या देशवासीयांच लक्ष असणार आहे
१२ मार्च १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जण जखमी झाले होते. हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तब्बल तीन हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणण्यात आलं होतं. त्यापैकी टक्केच आरडीएक्सचा वापर करून हा महाभयंकर विध्वंस घडवण्यात आला होता. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार त्याला फासावर लटकवण्यातही आलंय.
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील एकूण १२९ आरोपींपैकी १०० जणांना टाडा न्यायालयाने याआधी दोषी ठरवलं होतं. त्यांनी केलेल्या गुन्ह्यानुसार, त्यांना ६ महिन्यांपासून ते फाशीपर्यंतची शिक्षा कोर्टाने सुनावली होती. या खटल्यातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांच्यासह २७ आरोपी अजूनही फरार आहेत.
-12 मार्च 1993 ला
कशा पद्धतीने मुंबई हादरली होती टाकूयात एक नजर
दुपारी १.३० वाजता – मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये स्फोट
दुपारी २.१५ वाजता – नरसी नाथ रोडवर स्फोट
दुपारी २.३० वाजता – शिवसेना भवनाजवळ तिसरा स्फोट
दुपारी २.३३ वाजता – एअर इंडियाच्या इमारतीजवळ स्फोट
दुपारी २.४५ वाजता – सेन्चुरी बाजारात स्फोट
दुपारी २.४५ वाजता – माहीममध्ये स्फोट
दुपारी ३.०५ वाजता – झवेरी बाजारात स्फोट
दुपारी ३.१० वाजता – सी रॉक हॉटेलमध्ये स्फोट
दुपारी ३.१३ वाजता – प्लाझा सिनेमाजवळ स्फोट
दुपारी ३.२० वाजता – जुहू सेंटर हॉटेलमध्ये दहावा स्फोट
दुपारी ३.३० वाजता – सहार एअरपोर्टजवळ स्फोट
दुपारी ३.४० वाजता – एअरपोर्ट सेंटर हॉटेलमध्ये बारावा स्फोट