Pakistan: 19 वर्षांनंतर पाकिस्तानात जनगणना…

पाकिस्तानात 19 वर्षांच्या कालावधीनंतर जनगणना केली जात असून त्याची सुरुवात बुधवारपासून होणार आहे. 15 मार्च ते 15 एप्रिल हा जनगणनेचा पहिला टप्पा तर दुसरा टप्पा 25 एप्रिल ते 25 मे असा असेल. व यासाठी 18.5 अब्ज रूपये खर्च येणार आहे. खोटी माहिती देणार्‍याला 6 महिने जेल व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा दिली जाणार आहे, असे आर्मी प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले.
यापूर्वीची जनगणना 1998 साली झाली होती तेव्हा पाकिस्तानची लोकसंख्या 18 कोटी होती. वास्तविक ही जनगणना नोव्हेंबर 2016 मध्येच व्हायची होती मात्र त्यावेळी भारत पाक संबंधातील तणाव वाढल्याने ती पुढे ढकलली गेली होती.
या जनगणनेत लष्कराचे 2 लाख जवान मदत करणार आहेत. आसिफ गफूर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक गणकाधिकार्‍यासोबत 1 सैनिक असेल. हे घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. एकूण घरे, त्यात राहणार्‍या नागरिकांची संख्या नोंदविली जाईल. यावेळी सैनिक गणकाला सुरक्षा देतानाच मिळालेल्या माहितीचे व्हेरिफिकेशनही करेल. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. जनगणनेसाठी 1,18,918 सरकारी कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत.