जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे उघडले

पैठणः जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यानंतर धरणाचे रविवारी सायंकाळी चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्रीनंतर पुन्हा 12 दरवाजे उघडण्यात आले. या दरवाजांतून प्रत्येकी पाचशे क्युसेक म्हणजे एकूण 12 हजार 970 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू झाला आहे. चार दरवाजे एका फुटाने तर बारा दरवाजे अध्या फुटाने उघडण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील गोदावरीच्या महापुराच्या पाण्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या महिनाभराच्या कालावधीत मोठी वाढ झाली. त्यामुळे धरणातून यापूर्वीही पाणी सोडण्यात आले होते. आता धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झाल्यामुळे यातून पुन्हा पाणी सोडण्यात आले. रविवारी (ता. 15) जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीतचे धरणातून गोदापात्रात पाणी सोडले. मुख्य 16 दरवाज्यातून 10 हजार क्युसेक्स , वीज निर्मिती केंद्राच्या दरवाज्यातून 1590 डाव्या कालव्यातून 1200,उजव्या कालव्यातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

एक महिन्यानंतर पुन्हा सोडले पाणी!

दरम्यान, जायकवाडी धरणात ता. 27 जुलै रोजी पाणी येण्यास सुरवात झाली. यानंतर पहिल्या टप्प्यात तीन टक्के वाढ झाली. नंतर नाशिक जिल्ह्यातील पाऊस थांबल्याने जवळपास आठ दिवस पाणी आलेच नाही. नंतर मात्र नाशिक येथे अतिवृष्टीमुळे गोदावरीला पूर नव्हे तर महापूर आला. या महापुराचे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले. बघता बघता धरणाच्या पाणीपातळीने पन्नाशी ओलांडली. यानंतर तर नाशिकला दमदार पाऊस झाल्याने धरण 80 टक्के भरले. धरणातून स्वातंत्र्यदिनी ता. 15 ऑगस्टला पाणी सोडण्यात आले. त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजे ता. 15 सप्टेंबरला पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे.

Loading...

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदाकाठच्या गावांना तहसीलदार महेश सावंत यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या गावांतील ग्रामस्थांनी गोदापात्रात जाऊ नये. तसेच कुठलीही जीवित, वित्तहानी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Loading...