fbpx

सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे

सोलापूर ( सूर्यकांत आसबे ) – गळीत हंगाम संपताच चिमणीसाठी पर्यायी व्यवस्था करू असे लेखी पत्र देऊन त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविणारे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी शनिवारी साखर कारखान्याच्या दोन चिमणीशिवाय सोलापूर विमानसेवेला अन्य १४ अडथळे असल्याचा नवा खुलासा केला आहे.

 

दरम्यान चिमणी असताना दरवर्षी ५०० हुन अधिक विमानांचे सोलापूर विमानतळावरून उड्डाण झाले आणि आताच काय अडचण निर्माण झाली असे सांगत सोलापूर विमानसेवेला चिमण्यांचा कोणताही अडथळा नसून विमानसेवा एका बाजूने पूर्वीप्रमाणे सुरु राहू शकते असे सांगत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विमानसेवेला अडथळा ठरणारी कोजनरेशन प्रकल्पाची ८५ मीटरची चिमणी काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील जाहीर सभेत केलेल्या उड्डाण योजनेंतर्गत विमानसेवा सुरु करण्याच्या घोषणेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

सोलापूर – मुंबई विमानसेवेसाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्यासाठी सरकारने जोमाने प्रयत्न सुरु ठेवले होते. मात्र विमानतळाच्या शेजारी असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोजनरेशन प्रकल्पाच्या ८५ मीटर उंचीच्या चिमणीमुळे विमानसेवा सुरु होण्यास अडचण निर्माण झाली आहे. मागील वर्षी हि चिमणी काढण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाने प्रयत्न केले होते. परंतु साखर कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम संपताच पर्यायी व्यवस्था करू असे आश्वासन दिल्याने कारवाई थांबली होती. त्याला आता वर्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी सोलापुरात आल्यानंतर त्यांनी लवकरच सोलापुरातून विमानसेवा सुरु होईल असे सांगितले होते.

दरम्यान येत्या १३ फेब्रुवारीपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्याबाबत दिल्ली येथून हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी स्पाइस जेट आणि टर्बो मेगा या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. छोटी शहरे विमानसेवेने जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने उडान हि योजना जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन शहरात विमानसेवा देणाऱ्या कंपनीला प्रत्येक फेरीतील ५० टक्के आसने सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी लागतात. प्रवाशांअभावी आसने रिक्त राहिल्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात विमान कंपनीचा तोटा भरून काढला जातो. देशांतर्गत विमानसेवा मजबूत करण्याच्या दृष्टीने महापालिकांकडे विमानसेवेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने राज्यात आता पुन्हा राज्यात उडान योजनेचा प्रयोग १३ फेब्रुवारीपासून करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सोलापूर – बंगळुरु , सोलापूर-हैद्राबाद या मार्गावरही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना सोलापूर विमानसेवेबद्धल विचारले असता अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नाही आणि आपल्याकडे कोणतीही माहिती आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

बोरामणी विमानतळ सुरु करण्यासाठी प्रयत्न व्हावेत
भविष्यातील मोठी विमानं , उड्डाण आणि इतर बाबी लक्षात घेऊन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा केली. त्यासाठी जमीन अधिग्रहण झाले आहे. ते विमानतळ सुरु होण्यासाठी प्रयत्न होण्यापेक्षा जुन्या विमानतळाच्या अडचणी पुढे आणल्या जात आहेत. सोलापूर विमानतळ एका बाजूला कारखाना आणि दुसऱ्या बाजूला वसाहत असल्याने वाढू शकत नाही. १९७१ साली पहिली चिमणी उभारली गेली. दुसरी चिमणी अलीकडच्या काळात उभारली गेली. त्याची उंची ८५ मीटर आहे. ती ३० मीटर करा असे सांगितले जाते मात्र आम्ही त्यासाठी पर्यायी जागा द्या किंवा आहे त्या चिमणीला परवानगी द्या यासाठी पाठपुरावा केला आहे. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ३० मीटरच्या चिमणीमध्ये कारखान्याचा कोजनरेशन प्रकल्प चालविता येणार नाही. त्यामुळे जुन्या विमानतळापेक्षा बोरामणी येथील नवीन विमानतळासाठी रेटा लावला पाहिजे , असे सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी सांगितले.