fbpx

धुळ्यात बस-कंटेनरमध्ये भीषण अपघात, १३ प्रवासी जागीच ठार

टीम महाराष्ट्र देशा :  औरंगाबाद-शहादा बसला भीषण अपघात झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या या बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २० प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळ रविवारी रात्री मालवाहू कंटेनर आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. वेगात असलेल्या बसची कंटेनरला धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की बसची अर्धी बाजू अक्षरशः कापली गेली. त्यामुळे यामध्ये १३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तसेच या अपघातात जवळपास ३५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती. या जखमींवर शहादा, दोंडाईचा, धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ही बस औरंगाबादहून नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याला जात होती. भरधाव वेगात असलेली बस कंटेनरवर धडकल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. तसेच बसमधील प्रवास करणारे सर्व प्रवासी शहादा शहरातील व आसपासच्या भागातील असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, एसटी महामंडळातर्फे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दहा हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली आहे, तसेच जखमींनाही प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहेत. तसेच जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.