पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिकाचा १२०० कोटींना गंडा ?

डीएसकेंनी 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई : घराला घरपण देणाऱ्या पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मागची घरघर काही थांबण्याच नाव घेत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या डीएसके यांच्या अडचणीत आता अजूनच भर पडण्याची शक्यता आहे. कारण आता डीएसकेंनी 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
डी. एस, कुलकर्णी यांच्या DSK ग्रुपनं 1200 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करत यासंबंधी मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि PF आयुक्तांकडे किरीट सोमय्यांनी तक्रार केली आहे. तसेच यासंबंधी त्यांनी कारवाईची देखील मागणी केली आहे.

मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत.
२०१४ पासून अनेकांनी घरं बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून डीएसके यांच्या मागे घर-घर लागली आहे.

काय आहे ड्रीम सिटी प्रोजेक्ट ?
पुणे – सोलापूर रस्त्यालगत ३०० एकर जागेत स्वप्नवत वाटणाऱ्या ड्रीम सिटी प्रोजेक्ट चा १९ डिसेंबर २०१४ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.या ड्रीम सिटीत स्वप्नवत वाटणाऱ्या सगळ्याच सोई होत्या , कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली.
इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आता आरोप होतो आहे.
अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील केला आहे केला आहे.
लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले.
सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं.
मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली.