कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी १२ जणांना अटक

हे सर्व बारा आरोपी कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील आहेत

पुणे : भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर अखेर पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे. तब्बल आठ दिवसांच्या कालावधी नंतर आज १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत. हे सर्व बारा आरोपी कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील आहेत. दोन्ही गटातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यानं या बाराही आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. अटक केलेल्या आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला, किंवा यामागे नेमकं कोण होतं? या सर्व गोष्टींची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. त्याचबरोबर त्या भागांमध्ये सध्या तपास सुरु आहे सीसीटीव्ही च्या माध्यमातून ओळख पटवण्याचे काम चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.