fbpx

‘१०१ टक्के सांगतो नथुराम गोडसेंचा जन्म बारामतीतचं झाला’

सुधीर मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त राज्य सरकार मोठा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेला उत्तर देताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. हे उत्तर ऐकताचं विरोधकांची देखील बोलती बंद झाली आहे.

युती सरकारच्या काळात महात्मा गांधींऐवजी त्यांचे खुनी नथुराम गोडसेचा उदो उदो केला जात आहे, अशी टीका विरोधकांनी केली होती. यावर पलटवार करताना नथुराम गोडसेंचा जन्म बारामतीला झाला असा पलटवार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर खुद्द अजित पवार यांनाही काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडला.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, नथुराम गोडसे यांचा जन्म बारामतीचा आहे हे दुर्दैव आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र नाही, इंटरनेटवर आहे त्याचे प्रिंट आऊट काढा. मी १०१ टक्के सांगतो त्यांचा जन्म हा बारामतीतच झालाय. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वात जास्त काळ महाराष्ट्रात व्यतित केला होता. ही बाब आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे. गांधींनी चले जावचा नारा गवालिया टँकवर दिला. गवालिया टँकवर चलेजावच्या आंदोलनाचा स्तंभ उभा केलाय आणि त्यावर कमळाचं फूल आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान फडणवीस सरकाच्या कार्यकाळातले शेवटचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेचं धारेवर धरले आहे. तर सत्ताधरी देखील विरोधकांच्या प्रश्नांना तोडीसतोड उत्तर देत दुष्काळ, शेतकरी आत्माहत्या, बेरोजगारी या मुद्यांवरून केलेले आरोप फेटाळून लावत आहेत.