चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १००% संरक्षण, चुकीचे काम कराल तर शिक्षा- तुकाराम मुंढे

नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे हे पत्रकार परिषेदेत बोलत होते.

नाशिक: आपल्या प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी प्रसिद्ध असलेले आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलमधून बदली होऊन ते नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त झाले आहेत. आज ( शुक्रवार ) रोजी ते महापालिकेतील आपल्या दालनात सकाळी १० वाजताच हजर झाले. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे हे पत्रकार परिषेदेत बोलत होते. ते म्हणाले, विभागातील जे कर्मचारी चांगले काम करतील त्याला माझे १०० टक्के संरक्षण असेल. मात्र, जो चुकीचे काम करेन त्याला शिक्षा भोगावी लागेल.

काय म्हणाले तुकाराम मुंढे?

नाशिक शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पार्किंगचा प्रश्न हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अंतर्गत येत असल्याने त्यासाठी नवे पार्किंग धोरण ठरवावे लागणार आहे. ते अस्तित्वात नसेल तर निर्माण करु, त्याचबरोबर रस्त्यावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ऑन रोडपेक्षा ऑफरोड पार्किंगला प्रधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नवे पार्किंगच्या जागा विकसित केल्या जातील.

तसेच रस्त्यावरील पार्किंग टाळण्यासाठी याचे दर अधिक ठेवण्यात येतील. नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवी वाहतुक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यापूर्वी नवी मुंबई आणि पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रमुखपदावर काम पाहिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये त्याचा निश्चित फायदा होईल.

पालिकेच्या सफाई कामगारांनी वेळेवर कामावर गेले पाहिजे, तसेच सर्व परिसर स्वच्छ केला पाहिजे. यासाठी निरिक्षकांना त्यांच्या कामाची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. रस्त्यावरील सफाईचे मी देखील अधूनमधून निरीक्षण करणार आहे. त्याचबरोबर शहरातील कचराकुंड्या ओसंडून वाहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. कमीत कमी कचरा शिल्लक रहावा यासाठी कचरा विलगीकरणाला प्रधान्य देण्यात येणार आहे.

शहर स्वच्छ रहावे यासाठी दुकानदारांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शहर घाण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे बिन बसवण्यात येणार आहेत. तसेच आपापल्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारची कामे प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच जे कर्मचारी चांगले काम करतील त्याला माझे १०० टक्के संरक्षण असेल. मात्र, जो चुकीचे काम करेन त्याला शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.