पबजी पडले महागात ;  १० जणांना अटक

टीम महाराष्ट्र देशा : परीक्षेच्या काळामध्ये पबजी गेम खेळण्यावर गुजरात सरकारने बंदी घातलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मोबाईलवर पबजी गेम खेळणाऱ्या १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राजकोट येथील १० जणांना पोलिसांनी पबजी गेम खेळून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी त्यांचे मोबाईलदेखील पुढील तपासासाठी जप्त केले आहेत.

पबजीवर बंदी

अति तिथे माती या म्हणीप्रमाणेचं, बंदी असून देखील सार्वजनिक ठिकाणी पबजी गेम खेळण १० जणांना खूप महागात पडलेले आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये सूरत आणि राजकोटमध्ये पबजी खेळण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीदेखील काही जणांकडून या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करण्याचे मनावर घेतले आहे.

पबजी चे व्यसनी

तरुणाईला अक्षरशः या गेमचे व्यसन लागलेले आहे. या व्यसनापाई आपला कित्येक वेळ खर्च होतोय याचे भान देखील उरत नाही. एवढेच नाही तर, गेमच्या वेडापाई मानसिक संतुलन बिघडल्याची देखील उदाहरणे समोर आली आहेत. या गेमसाठी एकाने घरामध्येच ५० हजारांची चोरी केल्याची देखील घटना घडली होती.