गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी यंदा 10 कोटीचा निधी

टीम महाराष्ट्र देशा : गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळेच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या आरखड्यातील कामांसाठी सुमारे 10 कोटींचा निधी यंदा मिळणार आहे. यामध्ये रस्ते विकास, वाहनतळ, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना, सुशोभिकरण, वाहनतळ व मंदिर परिसरात सौर ऊर्जा आदी कामे प्रस्तावित केली आहेत.

यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्त व नियोजन मंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, गणपती पुळे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राचे आयकॉन आहे. येथे येणाऱ्या भाविकांना चांगली सुविधा मिळावी तसेच मंदिराचा परिसर स्वच्छ असावा, यासाठी सजग रहावे. घाणपाणी समुद्रात सोडले जाऊ नये, यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे. साफसफाईसाठी मनुष्यबळ खासगी माध्यमातून घेण्यात यावे.

मुनगंटीवार म्हणाले, तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामांचा प्राधान्य क्रम ठरवून टप्प्याटप्प्याने कामे सुरू करावीत. पहिल्या टप्प्यात मंदिर परिसर व भाविकांशी संबंधित कामे करण्यात यावीत. तर दुसऱ्या टप्प्यात रस्ते, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे तर तिसऱ्या टप्प्यात सुशोभिकरण आदी कामे करण्यात यावीत. मंदिराचे व परिसराचे सुशोभिकरण करत असताना जे.जे. स्कूलच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.