राष्ट्रवादीच्या झेंड्याला आता भगव्या झेंड्याची जोड

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आता इथून पुढे दोन झेंडे वापरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इथून पुढच्या सर्व कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्या बरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा असेल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, देशात आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का ? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे असणार आहेत.अजित पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला देखील पक्ष चालवण्यासाठी भगव्याची गरज पडली का ? असा प्रश्न समाज माध्यमांवर विचारला जात आहे. तर राजकारण आता भगव्या झेंड्या जवळ येऊन थांबले असल्याच दिसत आहे.

देशात मोदी सरकार आल्याने आधीच देशाचे राजकारण हिंदुत्व आणि भगव्या रंगाच्या भोवती फिरू लागले आहे. तर राज्यात देखील सेना-भाजप सरकार हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येऊन राज्याचा गाडा हाकत आहे.त्यात आता राष्ट्रवादीने देखील पक्षाच्या झेंड्याला भगव्या झेंड्याची जोड दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भगव्या झेंड्यावरून राजकारण होणार असल्याच दिसत आहे.