जम्मू काश्मीरमध्ये शांतता कायम, दूरध्वनी आणि 2 जी इंटरनेट सेवा सुरु

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा म्हणून दिलेले कलम 370 मोदी सरकारने हटवले आहे. मात्र हे कलम हटवताना जम्मू काश्मीर खोऱ्यात कोणत्याही प्रकारची निदर्शने किंवा हिंसा होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जम्मू काश्मीरमध्ये जमावबंदी लागू केली होती. तर इंटरनेट, नेटवर्क, केबल लाईन बंद करण्यात आल्या होत्या व या सेवांवर काही निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आज पासून जम्मू काश्मीरमध्ये दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. तर जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील दूरध्वनी आणि 2जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे.तसेच सोमवारपासून शाळा – महाविद्यालये देखील सुरु होणार आहेत.

जम्मू काश्मीरवर लागू केलेली जमावबंदी काढून टाकण्याची स्थानिकांकडून वारंवार मागणी होत होती. या मागणी नुसार सोमवार पासून जमावबंदी शिथिल करण्यात येणार आहे.गेल्या 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून खुले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तर शुक्रवार पासूनचं प्रशासकीय कामाला सुरवात झाली आहे. जम्मू काश्मीर खोऱ्यात शांतता कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून शाळा महाविद्यालये सुरु करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट, नेटवर्क, केबल लाईन बंद करण्यात आल्या होत्या व या सेवांवर काही निर्बंध घालण्यात आले होते. हे निर्बंध काढून टाकावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी केली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितली होते.काँग्रेस कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांनी ही याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालायने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलताना जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा एकदा सर्वसामान्य होण्याची वाट पाहू असं सांगितलं होते.