१० मिनिटांच्या लॉटरीसाठी १ तास ३४ मिनिटांचा टाईमपास; म्हाडाच्या घरांची लॉटरी लागली की, नाही समजलेही नाही!

औरंगाबाद : सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या वतीने योजना आखल्या जातात. अशाच औरंगाबाद आणि हिंगोलीमधील ८६४ घरांची सोडत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. मात्र, हक्काचे घर मिळावे याची प्रतिक्षा करणाऱ्या इच्छुक अर्जदारांना म्हाडाच्या ऑनलाईन गोंधळाचा फटका बसला. आधीच वेळेत सुरू न झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांचा सत्कार आणि नेत्यांची भाषणं या मुळे एक तास ३४ मिनिटांची रटाळवाणी प्रतिक्षा करावी लागली.

म्हाडाच्या सदनिकांसाठी विविध उत्पन्न गटांतील एकूण ८६४ सदनिकांसाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यास अनुसरून एकूण ८ हजार २२६ अर्ज प्राप्त झालेले होते. सदरील योजनेची सोडत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाली. यात औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि राज्यमंत्री सतेज पाटील हे ही ऑनलाईन उपस्थित होते. मात्र, या रटाळ कार्यक्रमाचा आणि भाषणाचा फटका हक्काच्या घराची प्रतिक्षा करत असलेल्या सर्व अर्जदारांना बसला.

आधी स्वागत समारंभासाठी आणि भाषणासाठी भरपूर वेळ असलेल्या म्हाडाकडे ज्यांना घरे प्राप्त झाली त्यांची नावे वाचण्यासाठी किंवा त्याची यादी दाखवण्यासाठी मात्र, वेळ नव्हता. त्यामुळे आपल्याला घर मिळाले की नाही, ही प्रतिक्षा कायम राहिली. सायंकाळी ६ वाजता ही यादी संकेतस्थळावर देण्यात येईल, एवढेच उत्तर म्हाडाकडून देण्यात आले. त्यामुळे दोन तास प्रतिक्षा करत असलेल्या अर्जदारांना पुन्हा प्रतिक्षा करायला भाग पाडण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP